Home देश हे भाजपचे ‘ऑपरेशन राम मंदिर’ आहे का? – उध्दव ठाकरे

हे भाजपचे ‘ऑपरेशन राम मंदिर’ आहे का? – उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.३: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून आणि चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ येत्या रविवारी, म्हणजेच ५ जुलै रोजी मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिराजवळ शिवसेना जाहीर ‘रामरक्षा’ आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीवर बोट ठेवले.

‘भाजपने केवळ सत्तेचा उपभोग घेतला’

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनाच्या इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले: “भाजपचा पाया हा राम मंदिर आंदोलनावर रचला गेला आहे. जेव्हा हे आंदोलन सुरू झाले, तेव्हा भाजपचे लोकसभेत केवळ दोनच खासदार होते. त्या कठीण काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हुंकार देत देशभर दौरे केले. भाजपच्या रथयात्रेला शिवसेनेने खंबीर पाठिंबा दिला. या आंदोलनानंतर देशाने दंगली आणि बॉम्बस्फोटांचा दंश झेलला, अनेक हिंदूंनी यातना सहन केल्या. आज त्याच आंदोलनाच्या बळावर भाजप देशात अमर्याद सत्ता उपभोगत आहे. मात्र, आज त्यांच्याच राजवटीत राम मंदिर एका चुकीच्या आणि लज्जास्पद कारणामुळे चर्चेत आले आहे.”

सध्याच्या घडीला देशात संपूर्ण अनास्था पसरली असून, सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्याही गोष्टीची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व उरलेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

‘लुटारूंना हिंदू माफ करणार नाही’

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अटलजी एकदा म्हणाले होते की, ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’, पण आजच्या परिस्थितीला पाहून मी म्हणतो की, ‘मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा’. जे लोक देवाचे मंदिर लुटत आहेत, त्यांना हिंदू समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. या संघर्षाची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करत आहोत.” दादर येथील हनुमान मंदिराबाहेर होणाऱ्या या ‘रामरक्षा’ आंदोलनात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

“हे भाजपचे ‘ऑपरेशन राम मंदिर’ आहे का?”

भाजपच्या राजकीय कार्यपद्धतीवर तोफ डागताना ठाकरे म्हणाले की, “दुसऱ्यांचे राजकीय पक्ष फोडणे, आमदारांची खरेदी-विक्री करून त्यांना गोव्यात किंवा इतर राज्यांत पळवून नेणे आणि या गलिच्छ राजकारणाला ‘ऑपरेशन’ असे नाव देणे हा भाजपचा धंदा झाला आहे. मग आता राम मंदिरात जो दरोडा पडला आहे, ते भाजपचे ‘ऑपरेशन राम मंदिर’ आहे का? हा मोठा प्रश्न आहे.” माध्यमांमध्ये या बातम्या दाबल्या जात असल्या तरी राम मंदिराच्या पैशांवर दरोडा पडल्याचे स्पष्ट पुरावे समोर आले असल्याचा दावाही त्यांनी शेवटी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.