नैनीताल,दि.२: Corona: कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) देशात पुन्हा आढळत आहे. कोरोनामुळे (Covid -19) बंद करण्यात आलेल्या शाळा कॉलेज सुरू करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) अहमदनगर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात ८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. नैनीताल सुयालबाडी येथील जवाहर नवोदय विद्यालयात कोरोना बॉम्ब फुटला आहे. शाळेत एकाचवेळी ८५ विद्यार्थी कोरोना बाधित (85 students found infected with corona at Jawahar Navodaya Vidyalaya in Nainital Suyalbadi) आढळल्याने खळबळ उडाली असून शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले टाकत शाळेतील सर्वच मुलांना विलगीकरणात ठेवले आहे. आतापर्यंत शाळेत एकूण ९६ मुलांना करोनाची लागण झाली आहे.
अल्मोडा-हल्द्वानी हायवेवर गंगरकोट सुयालबाडी येथे जवाहर नवोदय विद्यालय असून कोरोनाच्या एंट्रीने या शाळेत भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्वप्रथम शाळेतील काही विद्यार्थी व कर्मचारी यांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करण्यात आली. त्यात मुख्याध्यापकांसह ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने पावले टाकत एक विशेष पथक शाळेत रवाना केलं. शाळेत चाचणी शिबीर घेण्यात आलं. त्यात ४९६ मुलांचे स्वॅब घेण्यात आले. शनिवारी या सर्व मुलांचे अहवाल आले असून त्यातील ८५ मुलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकाचवेळी ८५ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. उपजिल्हाधिकारी राहुल साह यांच्या निर्देशावरून शाळेत आधीच मायक्रो कंटेनमेंट झोन बनवण्यात आला असून आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाधित आढळल्याने इतर उपाययोजनाही करण्यात येत आहेत. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना शाळेतच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व मुलांवर शाळेतच उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी शाळेत एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.
दरम्यान, चाचणीत जे विद्यार्थी निगेटिव्ह आढळले आहेत त्यांची आता रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घरी पाठवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राहुल साह यांनी सांगितले.