CDS Bipin Rawat : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत (CDS Bipin Rawat) यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे. (CDS Bipin Rawat dies in helicopter crash)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तमिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी दुपारी हा भीषण अपघात झाला.
या अपघातावर शोक व्यक्त करताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले की, जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा विलक्षण शौर्याने आणि पराक्रमाची द्योतक होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आणि म्हटले की, तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी मनापासून भारताची सेवा केली. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, गृहमंत्री अमित शाह यांनीही म्हटले की, देशासाठी हा अत्यंत दुःखद दिवस आहे… कारण आम्ही आमचे सीडीएस जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. मातृभूमीची अत्यंत निष्ठेने सेवा करणाऱ्या शूर सैनिकांपैकी ते एक होते. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात व्यक्त करता येणार नाही.मला खूप दु:ख झाले आहे.