नवी दिल्ली,दि.२९: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी केवळ भविष्यातील संकटांची चाहूलच दिली नाही, तर अफवा पसरवणाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले आहे.
युद्धाची झळ आणि भारताची अभेद्य ढाल
सध्या जगाच्या ज्या भागात युद्ध पेटले आहे, तो भाग ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता पंतप्रधानांनी वर्तवली आहे. मात्र, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि गेल्या दहा वर्षांत वाढलेली देशाची शक्ती यामुळे भारत कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. हा काळ आव्हानात्मक असला तरी देशवासियांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वार्थी राजकारण आणि अफवांचे सावट
इंधन टंचाईच्या नावाखाली देशात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर पंतप्रधानांनी जोरदार निशाणा साधला. “हा १४० कोटी जनतेच्या हिताचा प्रश्न आहे, यात राजकारण आणू नका,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा आणि अफवा पसरवून देशाचे नुकसान करणाऱ्यांपासून सावध राहा, असा कडक इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे.
मैदानातील ऐतिहासिक विजय आणि तरुणाईचा जोश
क्रीडा विश्वासाठी मार्च महिना क्रांतीकारक ठरल्याचे मोदींनी नमूद केले. भारताचा T20 विश्वचषकातील ऐतिहासिक विजय असो किंवा जम्मू-काश्मीर संघाने ७० वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये कोरलेले नाव, प्रत्येक यशाने देशाची मान उंचावली आहे. न्यूयॉर्कच्या मॅरेथॉनमध्ये गुलवीर सिंह यांनी मिळवलेले यश हे भारतीय तरुणांच्या जिद्दीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंकटावर मात आणि अमृत सरोवरांची साथ
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील जलसंकटावर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. मात्र, यावर उपाय म्हणून लोकसहभागातून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. ‘अमृत सरोवर’ अभियानांतर्गत देशभरात उभारलेली ७० हजार सरोवरे ही येणाऱ्या काळात जलसंधारणाची मोठी शक्ती ठरणार आहेत.
आरोग्याचा मंत्र आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प
देशाला फिट ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाला दोन महत्त्वाचे बदल करण्याचे आवाहन केले – आहारात साखरेचे प्रमाण कमी करणे आणि खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी घटवणे. आगामी योग दिनाची तयारी आतापासूनच सुरू करण्याचे सांगतानाच, ‘MY Bharat’ आणि ‘Budget Quest’ सारख्या उपक्रमांतून लाखो युवक राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात कसे जोडले जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली.








