Home महाराष्ट्र लाडकी बहीण योजना: ३१ मार्चपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा कायमचा लाभ...

लाडकी बहीण योजना: ३१ मार्चपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा कायमचा लाभ बंद होणार!

0

मुंबई,दि.२६: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने (Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांना मोठा आर्थिक आधार दिला आहे. २८ जून २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत २१ ते ६४ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. मात्र, आता राज्य सरकारने या योजनेच्या नियमांत मोठी कडक पावले उचलली असून, अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे.

एप्रिल महिन्यात मिळणार ४५०० रुपये!

अधिकृत माहितीनुसार, ज्या महिलांची कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण आहे, अशा लाभार्थींच्या खात्यावर एप्रिल महिन्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये जमा होणार आहेत.

३१ मार्चची डेडलाईन कशासाठी?

ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांच्यासाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची संधी आहे.

• केवायसी अनिवार्य: नोव्हेंबर-डिसेंबरपासून आदेश देऊनही अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

• दुरुस्तीची संधी: ज्यांच्या केवायसीमध्ये चुका आहेत, त्यांना स्थानिक प्रशासनाकडून (मुंबईसह सर्वत्र) मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

• लक्षात ठेवा: ही मुदत केवळ त्रुटी दुरुस्तीसाठी आहे; ज्यांनी अद्याप प्रक्रियेला सुरुवातच केलेली नाही, त्यांच्यासाठी नवीन मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर आहे.

या महिलांची नावे योजनेतून बाद

शासनाने तपासणी करून खालील कारणांमुळे अनेक अर्ज अपात्र ठरवले आहेत:

1. उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे.

2. शासकीय नोकरी: कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी असणे.

3. साधने: कुटुंबाकडे चारचाकी वाहन उपलब्ध असणे.

4. दुहेरी लाभ: केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असणे.

5. इतर: वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिला आणि मृत लाभार्थींची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

जर एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर समजून जा की तांत्रिक त्रुटी किंवा अपात्रतेमुळे तुमचा या योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.