सोलापूर,दि.१८: सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजप नगरसेवकांना खूश करण्यासाठी स्थायी समितीने अंदाजपत्रकात मोठे फेरबदल केले आहेत. सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत, विकास कामांच्या नावाखाली झोन निधीत कपात करून भांडवली कामांसाठी तब्बल ७० कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
आयुक्तांनी तीन दिवसांपूर्वी १३८३ कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीने त्यामध्ये ५ कोटी ६९ लाख रुपयांची वाढ सुचवून आता १३८९ कोटी ७ लाख १८ हजार ४०१ रुपयांच्या अंदाजपत्रकास बहुमताने मंजुरी दिली आहे. या अंदाजपत्रकाला आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी दिली जाईल.
महसुली उत्पन्नात वाढीचे उद्दिष्ट स्थायी समितीने आयुक्तांच्या तुलनेत सुमारे ६ कोटींची महसुली वाढ अपेक्षित धरली आहे. यामध्ये महापालिकेच्या मालमत्तेपासून मिळणारे भाडे उत्पन्न १९ कोटी ६४ लाखांवरून २२ कोटी २४ लाख रुपये, तर विक्री आणि भाड्यातून मिळणारे उत्पन्न २ कोटी १० लाखांवरून ४ कोटी ८५ लाख रुपये इतके निश्चित केले आहे. एकूण अपेक्षित उत्पन्न ९२४ कोटी ४२ लाखांवरून ९३० कोटी ११ लाख रुपयांवर नेण्यात आले आहे.
झोन निधीवर संक्रात आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकात भांडवली कामांसाठी ३१ कोटी ७४ लाख रुपये ठेवले होते. मात्र, नगरसेवकांचा निधी वाढवण्यासाठी स्थायी समितीने ही तरतूद थेट १०१ कोटी ५१ लाख रुपयांवर नेली आहे. ही ७० कोटींची वाढ करण्यासाठी आयुक्तांनी ‘झोन’साठी ठेवलेल्या निधीला कात्री लावली आहे. “झोनसाठी केलेली ही तरतूद अनावश्यक होती,” असे स्पष्टीकरण सभापती रंजिता चाकोते यांनी दिले आहे.
लोकाभिमुख अर्थसंकल्पाचा दावा “यावेळच्या अर्थसंकल्पात जनतेचा सहभाग घेण्यासाठी सूचना मागवल्या होत्या. तीन दिवसांत ६३९ सूचना प्राप्त झाल्या असून त्या सर्वांची दखल घेतली जाईल. काही सूचनांचा विचार आताच केला आहे, तर उर्वरित सूचना टप्प्याटप्प्याने अमलात आणल्या जातील. त्यामुळे हे अंदाजपत्रक खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आहे,” असे सभापती रंजिता चाकोते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.








