देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य 

0

बारामती,दि.४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खासदार शरद पवारांनी मोठा खुलासा केला होता. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण होणार असल्याचा खुलासा शरद पवारांनी केला होता. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार होते असे सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरणावर अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. अशी चर्चा झाली असती तर अजित पवारांनी सांगितले असते असे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असेही शरद पवार म्हणाले.

बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या या विधानावर शरद पवारांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार आहे हे मला समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलीनीकरणावर चर्चा करत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here