Bullet Train | व्हाया सोलापूर पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे

0

सोलापूर,दि.३: Bullet Train | नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशात ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडोअर बनवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. त्यामध्ये पुणे–हैदराबादचाही समावेश आहे. हा महत्वाकांक्षी मार्ग सोलापूरमार्गे जाणार असल्याने सोलापूर शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सोलापूरची पुणे, मुंबईसह दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांशी थेट व वेगवान जोडणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत डीआरएम कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हे दोन्ही मार्ग हाय स्पीड रेल्वेद्वारे जोडले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे अवघ्या ४८ मिनिटांत तर पुणे–हैदराबाद १ तास ५५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. हाय स्पीड रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या रेल्वे कॉरिडॉरमुळे सोलापूर, पुणे, हैदराबादसारख्या शहरांमधील संपर्क अधिक सुलभ होणार असून नवीन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. या अंतर्गत धावणाऱ्या अत्याधुनिक गाड्यांसाठी लवकरच डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केला जाणार आहे. साधारण पाच वर्षांच्या कालावधीत ही हाय स्पीड रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी नमूद केले. 

याशिवाय महाराष्ट्रासाठी २३८ नवीन अत्याधुनिक रेल्वे गाड्या उपलब्ध होणार असून मेट्रोपेक्षा अधिक सुविधा, ऑक्सीजनसह विविध आधुनिक सोयी या गाड्यांमध्ये असतील. राज्यात १३२ नवीन रेल्वे स्थानकांचे काम सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

पुणे–हैदराबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे, मुंबई आणि हैदराबाद या आयटी हबसोबत सोलापूरची थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. त्यामुळे आयटी कंपन्या, स्टार्टअप्स, बँकांची कार्यालये, डेटा सेंटर्स आणि तंत्रज्ञानाधारित सेवा सोलापूरकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याच्या हालचालींनाही वेग येत असून हाय स्पीड रेल्वेची घोषणा शहरासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

दरम्यान, सुरत–चेन्नई ग्रीन कॉरिडॉर (महामार्ग) प्रकल्पही प्रगतीपथावर आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांद्वारे दक्षिण भारत तसेच पुणे–मुंबईसारख्या आर्थिक नगरींशी सोलापूर जोडले जाणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष येत्या काळात सोलापूरकडे वळण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here