सोलापूर,दि.३१: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांनी बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण होणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याअगोदर अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बैठका झाल्या होत्या, असे सांगितले जात आहे. अनेकदा दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली असल्याचे बोलले जात होते. मात्र बारामतीत 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली होती. या बैठकीचा व्हिडीओ समोर आला आहे.
शरद पवार आणि अजित पवारांची बैठक 17 जानेवारीला बारामतीत पार पडली होती. या बैठकीत दोन्ही पक्षाचे विलीनकरण करण्याबाबत चर्चा झाली होती. अजित पवारांची भूमिका ही दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी होती. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.
काय म्हणाले शरद पवार?
बारामतीच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी खुलासा केला की, गेल्या 4 महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील हे या चर्चेचं नेतृत्व करत होते. सर्व चर्चा या दोघांनी केली. आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. 12 तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता परंतु या अपघाताने यात खंड पडला असं त्यांनी सांगितले.








