सोलापूर,दि.६: सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्क सुरू करण्याला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. सोमवारी , जामगोंडी मंगल कार्यालयात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते.
प्रास्ताविक शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केले.चव्हाण म्हणाले महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याकरिता भाजपा कटिबद्ध आहे. सोलापुरात आयटी पार्कचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाकडून मागणी करण्यात येईल. जाहीरनाम्यात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, स्वच्छता, रोजगारनिर्मिती व महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. “विकसित भारतासाठी विकसित सोलापूर” हे ब्रीदवाक्य घेऊन भाजप यंदाच्या निवडणुकीत जनतेसमोर जात आहे.
जाहीरनाम्यात सोलापूर शहरासाठी पुढील १०० दिवसांत १०० ई-बस रस्त्यावर आणण्याचे आश्वासन देण्यात आले असून, धूळमुक्त सोलापूरसाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. प्रत्येक प्रभागात क्रीडांगणे व उद्याने उभारली जाणार असून, हद्दवाढ भागात अत्याधुनिक रुग्णालये तसेच मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे.
गुंठेवारीचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे, सार्वजनिक ठिकाणी सुलभ स्वच्छतागृहे व महिलांसाठी स्वतंत्र ‘पिंक टॉयलेट’ उभारणे, प्रत्येक प्रभागात प्रभाग कार्यालय व एक खिडकी सेवा सुरू करणे, कर प्रणाली सुसूत्र करून नागरिकांवरील कराचा बोजा कमी करणे, तसेच बांधकाम परवाना प्रक्रियेत सुलभता आणण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. जन्म-मृत्यू दाखले विभागीय कार्यालयातच मिळावेत यासाठीही सुधारणा करण्यात येणार आहेत. एमआयडीसीतील सुविधा वाढवणे, वस्त्रोद्योगाला चालना देणे, सोलापूर ते तिरुपती, हैदराबाद व बंगळुरू विमानसेवा सुरू करणे, तसेच बोरामणी कार्गो विमानतळाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा मानस जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.
शहराच्या पायाभूत विकासासाठी उड्डाणपूल, अंडरपास व शहराभोवतालचा रिंग रोड पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, आदीला नदीचा प्रवाह रुंद करून शहरातील व शहराभोवतालच्या नाल्यांचा विकास आराखडा राबविला जाणार आहे. झोपडपट्ट्यांचा योजनांद्वारे पुनर्विकास, गर्दीच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे याचाही समावेश आहे.
स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, हद्दवाढ भागासाठी नव्या स्मशानभूमींची निर्मिती, पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर सोलापुरातील प्राणीसंग्रहालयाचे नूतनीकरण, नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण करून हद्दवाढ भागात नवे नाट्यगृह व संगीत अकादमी उभारणे, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर व तलावाचे सुशोभीकरण, धर्मवीर संभाजी तलाव स्वच्छ करून स्मृती उद्यान विकसित करणे, तसेच लक्ष्मी मंडईसह इतर भाजी मंडई अधिक सक्षम करून नवीन भाजी मंडई उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.








