सोलापूर,दि.१५: ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी (Prashant Joshi) यांना जाहीर करण्यात आला आहे.
आज मंगळवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार संघाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत रवींद्र मोकाशी यांची उपस्थिती राहणार आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पत्रकारितेला व्रत मानून प्रशांत जोशींचे काम | Prashant Joshi
कै. अविनाश कुलकर्णी यांनी अनेक वर्षं निस्वार्थी पत्रकारिता केली. त्यांनी अनेक पत्रकार तयार केले आहेत. त्यांच्या समवेत काम केलेल्या एका सहकाऱ्याने या उपक्रमासाठी योगदान दिले आहे. जोशी हे गेली तीन दशके पत्रकारितेला व्रत मानून काम करीत आहेत. सोलापूर शहरातील महत्त्वाच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. राजकीय, सामाजिक, साहित्यिक तसेच क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर सडेतोड लेखन करीत आहेत. या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांनी केले आहे.