गुना,दि.१३: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात शनिवारी हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना समोर आली आहे. पोलिस अधीक्षक (SP) संजीव कुमार सिन्हा यांनी सांगितले की, काही लोक जखमी झाले आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दुसरीकडे, दगडफेकीमुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बाजार बंद ठेवला आणि दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.
9 जणांना अटक
लोकांनी पोलिस स्टेशनला घेराव घातला आणि रस्ता अडवला. रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. याशिवाय, हल्लेखोरांविरुद्ध हल्ला, मालमत्तेचे नुकसान आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
एएसपी मान सिंह ठाकूर म्हणाले की, व्हिडिओ फुटेजच्या आधारे नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता वातावरण शांत आहे. याप्रकरणी सुमारे 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात 5 जणांची नावे आहेत.
शनिवारी एएनआयशी बोलताना एसपी संजीव कुमार सिन्हा म्हणाले, “कर्नलगंज मशिदीजवळून मिरवणूक जात होती. येथे दोन समुदायांमध्ये घोषणाबाजी सुरू होती. दगडफेकही झाल्याचे आम्हाला कळले. यात काही लोक जखमी झाले. माहिती मिळताच तातडीने पोलिसांना पाठवण्यात आले. १५-२० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य आहे. आम्ही लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन करतो.”