सोलापूर जिल्ह्यातील या गावातील पोलिस पाटील यांचे पद रद्द

0

सोलापूर,दि.८: पोलिस पाटील यांचे पद रद्द करण्यात आले आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. १४ महिन्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे वांगीचे पोलिस पाटील  धरेप्पा खडाखडे, आणि मनगोळीच्या पोलिस पाटील अश्विनी घंटे यांचे पोलीस पाटील पद रद्द केले आहे. प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

नियुक्ती झाल्यापासून  सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी नोटीस व स्मरणपत्र प्रांतकार्यालयाकडून देण्यात आले. या नोटीसीनंतरही जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

दक्षिण तालुक्यातील ८२ पोलीस पाटील यांची नियुक्ती ३ जानेवारी २०२३ रोजी झाली होती. नियुक्तीवेळी जातीचा दाखला ग्राह्य धरण्यात येतो.  मात्र नियुक्तीनंतर सहा महिन्यात ३ जुलैपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक होते. प्रशासनाने सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या पाच पोलीस पाटलांना ३ ऑक्टोंबर २०२३ मध्ये नोटीस दिल्या होत्या.

त्यामध्ये वांगीचे खडाखडे, आलेगावचे राजू माळी, वडगावचे संगय्या कपाळे, मनगोळीच्या घंटे, उळेवाडीचे सद्दाम कारभारी यांचा समावेश होता. या नोटीसीनंतर वडगावचे कपाळे आणि उळेवाडीच्या कारभारी यांनी जात प्रमाणपत्र सादर केले. परंतु उर्वरित  खडाखडे, माळी आणि घंटे या तिघांना ६ जानेवारी रोजी १५ दिवसाची दुसरी नोटीस काढण्यात आली आहे.

या नोटीसीनंतर आलेगावच्या पोलीस पाटलांनी जातवैधता प्रमाणपत्राची पोहोच सादर केली. तर खडाखडे आणि घंटे यांना तिसरी अंतिम नोटीस २५ जानेवारीला बजाविली. त्यानंतरही या दोन्ही पोलीस पाटलांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रांताधिकारी खडाखडे आणि घंटे यांचे पोलीस पाटील पद रद्दचे आदेश काढून त्यांना सेवामुक्त केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here