अंनिसच्या कार्यकर्त्यांनी काळ्या बाहुल्या टाकल्या काढून

0

सोलापूर,दि.४: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सोलापूर शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी आसरा पुला जवळ रेल्वे कन्स्ट्रक्शन बोर्डावरील लटकविलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्यामुळे आता नागरिकांच्या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे. अंनिसच्या म्हणण्यानुसार काळ्या बाहुल्यामुळे अफवा व गैरसमज पसरत होते.

आसरा पूलाजवळ महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बोर्डावर काळ्या बाहुल्या अडकवल्या आहेत अशी नागरिकात चर्चा सुरू झाली. त्यामुळे अफवा व गैरसमज पसरत गेले. हा काही जादू टोणाचा प्रकार आहे का असा समज नागरिकामध्ये सुरू झाला व अफवांचे पीक पसरले.  ही चर्चा अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या कार्यकर्त्यां च्या लक्षात आली. 

कार्यकर्त्यांनी आसरा पुलाजवळ जाऊन आसपासच्या नागरिकांमध्ये चौकशी केली तेव्हा असे कळले की त्या काळ्या बाहुल्या संभाजी ब्रिगेडने लावलेल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी वर्षभरापूर्वी  निधी मंजूर होऊन सुद्धा आसरा पुलाच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवस न झाल्याने त्याचा निषेध म्हणून त्या बाहुल्या त्या बोर्डवरती अडकवलेल्या होत्या. 

त्यांच्याशी अनिस शहर शाखेच्या कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर यांनी सामंजस्याने चर्चा करून अशा पध्दतीने बाहुल्या लावून काहीही निष्पन्न होणार नाही. उलट यामुळे अफवा गैरसमज पसरत असल्याचे सांगितले.  या बाहुल्या काढून टाकाव्यात अशी विनंती केली. चर्चेअंती अनिस कार्यकर्त्यांनी या बाहुल्या काढून टाकल्या. यावेळी  सोलापूर शहर शाखेतील कार्यकर्ते  डॉ अस्मिता बालगावकर, मधुरा सलवारू, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, कुंडलिक मोरे, आर डी गायकवाड, शकुंतला सूर्यवंशी, छाया मोरे तसेच संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here