मुंबई,दि.14: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार आहे. अशातच लोकपोलच्या सर्व्हेनं खळबळ उडवली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
लोकपोलने केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज बाहेर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज लोकपोलने वर्तवला आहे. लोकपोलच्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 151 ते 162 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकपोलच्या सर्वेक्षणानुसार महायुती 115 ते 128 जागा जिंकेल. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबर 2024 मध्येही लोकपोलचा सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला होता. यावेळी लोकपोलच्या सर्व्हेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील समस्या, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश, महाराष्ट्रात विकासकामांचा अभाव आणि वाढती बेरोजगारी, या सर्व गोष्टींमुळं महायुती सरकारला जोरदार विरोध होत आहे.