महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

0

मुंबई,दि.21: महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरमधील आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. संजय राऊत म्हणाले की, बदलापूरची घटना अतिशय नींदनीय आहे. आजच्या बैठकीत महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. बदलापूर प्रकरणी लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी आंदोलन केले. पण ज्यांनी आंदोलन केले त्यांच्याविरोधात खटले दाखल केले गेले असे संजय राऊत म्हणाले. 

शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची 

“महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला  आरसा दाखवण्याचे काम जनता करेल,” असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. 

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेच्या निषेशासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. काही पालकांनी जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक 10 तास ठिय्या मांडून बसले होते. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकांना तिथून हुसकावून लावलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here