मुंबई,दि.22: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) आरक्षणातील क्रिमी लेयरवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काही दलित आणि आदिवासी गटांनी पुकारलेल्या एकदिवसीय भारत बंद दरम्यान लोक विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले. यावेळी पाटण्यातील रस्त्यावरही बंदचे समर्थक दिसत होते.
अनेक ठिकाणी बंद समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, पाटण्यात समर्थकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस लाठीचार्ज करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने चुकून पाटण्याचे एसडीएम श्रीकांत कुंडलिक खांडेकर (IAS अधिकारी) यांच्यावर लाठीचार्ज केला.
मूळचे सोलापूरचे
श्रीकांत खांडेकर हे 2020 बॅचचे IAS अधिकारी आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी (प्रशिक्षण अंतर्गत) या पदावर त्यांची नियुक्ती झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पाटणा येथे एसडीएम म्हणून झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ते मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे आहेत. श्रीकांत खांडेकर यांनी दापोली कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससीमध्ये यशस्वी झाले होते. ते संपूर्ण देशात 33 व्या क्रमांकावर होते.
बिहारमध्ये बुधवारी विविध दलित आणि आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंददरम्यान काही जिल्ह्यांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि अनेक ठिकाणी पोलिसांना आंदोलकांना रोखण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांनी पाटणा, हाजीपूर, दरभंगा, जेहानाबाद आणि बेगुसराय जिल्ह्यांतील काही राष्ट्रीय महामार्गांसह रस्ते वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला, दरभंगा आणि बक्सर रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाहतूक विस्कळीत केली, ज्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.