पंढरपूर,दि.17: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.
एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आत्तापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधाबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मानाचे वारकरी यांचा सत्कार
शेतकरी बाळू शंकर अहिरे, वय 55 वर्षे, आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे. मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.