जालना,दि.22: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतूनच आरक्षण घेणार असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके व नागनाथ वाघमारे यांनी आज उपोषण स्थगित केले आहे. मंत्रीमंडळाच्या शिष्टमंडळाने हाके व वाघमारे यांची भेट घेतली होती, यानंतर उपोषण स्थगित केले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.
मी कशात नसणारे म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघडे पडले असून त्यांनीच लक्ष्मण हाके यांचे आंदोलन उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. राज्यात जर जातीय दंगली झाल्या तर त्याला फक्त छगन भुजबळ हेच जबाबदार असणार असा इशाराही त्यांनी दिला. वडीगोद्री येथे सुरू असलेलं आंदोलन हे मॅनेज असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
तर आमचा नाईलाज आहे
आमच्या कुणबी नोंदी या मूळच्या असून आम्ही ओबीसींमध्येच आहोत असंही जरांगे यांनी म्हटलं. सरकारने आणि ओबीसी नेत्यांनी जर मराठ्यांची वाटच लावायची ठरवली असेल तर आमचा नाईलाज आहे, होणारे परिणाम भोगायला तयार राहा असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात पान हलू शकणार नाही
दरम्यान, ओबीसीची मोट बांधून मराठ्यांवर अन्याय करतात, मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात पान हलू शकणार नाही. तुम्ही मराठ्यांचा अपमान करताय. आमच्या अंगावर त्यांना घालताय. ओबीसीचा मोट बांधण्याचा डाव असला तरी मनोज जरांगे हा डाव होऊ देणार नाही. मराठा एकत्र आहेत. तुमच्या पक्षातील मराठा नेतेही सहन करू शकत नाही. डोळ्यासमोरील अन्याय सहन करणाऱ्या मराठा नेत्यांसोबतही जनता राहणार नाही. असे मनोज जरांगे म्हणाले.
सगळे ओबीसी एक झाले तरी मी…
ओबीसीची मोट बांधण्याचा प्रयत्न करू नका हे देवेंद्र फडणवीसांना सांगतो. हे राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, तुमचा हा डाव मी हाणून पाडेन, सगळे ओबीसी एक झाले तरी मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, 13 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण आम्ही घेणारच असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना दिला.
आपणच एकटे 50-55 टक्के आहोत
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा कुणी करत असेल तर मराठ्यांनीच उत्तर द्यावे. मराठ्यांना आरक्षण मिळायला नको असं मराठा नेत्यांना वाटते का? मराठ्यांबद्दल इतका राग का? आरक्षणासाठी टोकाला जायची त्यांची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठे हे कळत नाही का? संविधानाच्या गप्पा करतायेत. हे संविधानाचे आंदोलन आहे का? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा. मराठ्यांचे मतदान गोड बोलून घेत होते त्यांचे खरे चेहरे आता बाहेर आले. मराठ्यांच्या नेत्यांनी शहाणे व्हावे. आपणच एकटे 50-55 टक्के आहोत हे काही करू शकत नाही. आमचा नाईलाज आहे. मराठ्यांच्या अंगावर कोणी आले तर आम्हीही रस्त्यावर उतरू. हे सरकारला चॅलेंज आहे असं त्यांनी सांगितले.