मुंबई,दि.19: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशातच मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहे, असे भुजबळ म्हणाले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकमधून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर येथून शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतर छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचे वृत्त धडकले.
मात्र अजित पवार यांनी त्यांची पत्नी आणि बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असून ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या वावड्या उठल्या. यावर आता स्वत: छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मी अजितदादांसोबत नाही…
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. नाराजीच्या चर्चा सर्व अफवा असून मी अजितदादांसोबत नाही, राष्ट्रवादीसोबत आहे, असे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, विधानसभेआधी किंवा त्यानंतरतही मी कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीसोबत कायम राहणार आहे. तसेच मी नाराज असून दुसऱ्यांना नेत्यांची भेट घेतली. यात कोणतेही तथ्य नाही. मला जर कुणाला भेटायचे असेल तर मी उघडपणे भेटेन, असेही ते म्हणाले.