पंढरपूर,दि.२८: पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दबाव असल्याने ते नाईलाजाने त्या पक्षात येत्या दोन दिवसात प्रवेश करतील, असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. रविवारी, अकलूज येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते.
ते नाईलाजाले तिकडे चालले आहेत…
पाटील म्हणाले, अभिजित पाटील यांच्यावर मोठा दबाव असून ते नाईलाजाने भाजपमध्ये जातील असे दिसत आहे. ते मनाने त्या पक्षात जात नसून मुसक्या बांधून त्यांना नेले जात असल्यासारखी त्यांची अवस्था आहे. येत्या दोन दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होत होत असून यात अभिजीत पाटील हे कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात. त्यांना त्या पक्षात जाऊ दे काही बिघडत नाही. कारण ते नाईलाजाले तिकडे चालले आहेत, आपण नंतर त्यांना शुद्धीकरण करून पुन्हा आपल्या पक्षात घेऊ, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली असून यानंतर अभिजीत पाटील समर्थकांच्या मध्ये अस्वस्थता पसरली आहे. मागील दोन दिवसापासून ते पाटील यांना सत्ताधारी पक्षाबरोबर जाण्यासाठी तगादा लावत आहेत. अनेक वर्षे विठ्ठल कारखाना अडचणीत असून मागील दोन वर्षापासून पाटील यांनी तो सुरळीत चालवला. मोठ्या प्रमाणामध्ये गाळप या कारखान्यात झाले आहे. मात्र मागील थकीत कर्जपोटी राज्य बँक कारवाई करत आहे. तसेच पुण्याच्या डीआरटी न्यायालयानेही कारवाई वरील स्थगिती उठवल्यानंतर साखरेची गोडाऊन सील करण्यात आली आहेत.
यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांचा गट अस्वस्थ आहे. हे पाहता ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत. मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात हिरीरीने प्रत्येक सभेला उपस्थित असणारे अभिजीत पाटील अकलूज येथील सभेसाठी आले नव्हते. कालपासून त्यांचे समर्थक त्यांना सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेण्याचा तगादा लावत आहेत. यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असे सांगितले जात आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाकाव येथे अभिजीत पाटील यांच्या प्रवेशाविषयी विचारले असता त्यांनी, आज कोणताही प्रवेश होणार नाही असे स्पष्ट केले. यामुळे कदाचित पंतप्रधानांच्या दौऱ्यात काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.