सुरगुजा,दि.28: छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील भाजपा आमदाराच्या भावाने गोंधळ घातल्याची बातमी आहे. मंगळवारी सायंकाळी येथील लखनपूर पोलीस ठाण्यात अंबिकापूरचे भाजपा आमदार राजेश अग्रवाल यांचे मोठे बंधू विजय अग्रवाल यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला आणि याप्रकरणी स्थानिक डीएसपीचीही बदली करण्यात आली आहे.
आमदाराच्या भावाची डीएसपीसोबत बाचाबाची
यादरम्यान भाजप आमदाराचा मोठा भाऊ विजय अग्रवाल यांचा प्रशिक्षणार्थी डीएसपीसोबत जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण दरोड्याशी संबंधित आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ग्रामपंचायत चिलबील, आमेरा आणि पूहपात्रा येथील चार तरुणांना दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात पाठवले होते. याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत चिलबील, आमेरा व पूहपात्रा ग्रामस्थांनी एकत्र येऊन लखनपूर पोलीस ठाण्याला घेराव घातला.

त्यानंतर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना शांत करून माघारी पाठवले, मात्र याच दरम्यान अंबिकापूरचे आमदार राजेश अग्रवाल यांचे मोठे बंधू विजय अग्रवाल यांनी या प्रकरणावर राजकारण करत आपल्या समर्थक व नातेवाईकांसह लखनपूर पोलीस ठाणे गाठून पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ करू लागले.
डीएसपींची बदली
यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित प्रशिक्षणार्थी डीएसपी शुभम तिवारी यांनी विजय अग्रवाल आणि त्यांच्या समर्थकांना शांततेने बोलण्यास सांगितले. असे सांगितले जात आहे की विजय अग्रवाल यांनी रागाच्या भरात प्रशिक्षणार्थी डीएसपीसोबत बाचाबाची केली. यानंतर प्रशिक्षणार्थी डीएसपीची बदली करण्यात आली असून, त्यांना येथून हटवून अंबिकापूर मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.