मुंबई,दि.20: आणखी एक काँग्रेसचा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर अनेक काँग्रेस आमदार व नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अशातच काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरूपम भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ हे सूचक वक्तव्य केलं होतं. इथं फडणवीसांच्या या वक्तव्यानं नजरा वळवलेल्या असतानात राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची चिन्हं अगदी स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
ZEE 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याचा प्रयत्न सुरु असून, यावेळी मुंबईमधील माजी खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या कैक वर्षांपासून राजकीय कारकिर्द पुढे नेणारे हे खासदार आहेत संजय निरुपम. काँग्रेसमधील एक मोठं नाव आणि मुंबईतील राजकारणासाठीची एक अनुभवी व्यक्ती म्हणून पक्ष निरुपम यांच्याकडे पाहत असतानाच त्यांनीही आता भाजपची वाट धरली तर, काँग्रेसपुढं मोठी अडचण उभी राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम पक्षावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. परिणामी संजय निरुपम यांना पक्षातून उमेदवारी देत काँग्रेसला धक्का देण्याची भाजपची तयारी असल्याचं म्हटलं जात आहे.