मुंबई,दि.8: आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी पर्यंत द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. डिसेंबर 2023 लाच निकाल लागणे अपेक्षित होते परंतू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदत वाढवून मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी 2024 पर्यंतची मुदतवाढ दिली होती.
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल 10 जानेवारीला लागणार आहे. बुधवारी 4 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजल्यानंतर निकालातील ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील तज्ज्ञांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी पाठवल्याचं वृत्त आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य होते.
निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी 7 जानेवारीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे. नार्वेकर 10 जानेवारीला महत्त्वाचा निकाल देणार आहेत. त्यामुळे नार्वेकरांचा काय फैसला येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.