सोलापूर,दि.2: फसवणूकप्रकरणी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बरोबरच सुमारे साडेसात कोटी रुपये 30 दिवसांच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने दिले आहेत.
धनादेश न वटल्याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष माढा विधानसभेचे अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार रणजितसिंह शिंदे व रणजित बोरावके यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाच्या न्याय दंडाधिकारी ट्विंकल चावला यांनी सैनिक फूड्स लिमिटेड कंपनीला साडेसात कोटींची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे. त्यांना सहा महिने साध्या करावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अध्यक्ष असलेल्या कर्नाटकातील इंडियन शुगर या साखर कारखान्याचे सैनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत साखर पुरवण्याचा करार झाला होता.
त्याच्यासाठी कंपनीने दहा कोटी रुपये दिले होते. त्यासाठी साखर कारखान्याने 5200 मेट्रिक टन साखर पुरवणे अपेक्षित होते, परंतु 2016-17 मध्ये 1942 टन साखर पुरवली, त्यामुळे कारखान्याकडून 8 कोटी 39 लाख रुपये येणे होते, तर त्यांच्याकडून कंपनीला 10 कोटी 62 लाख 89 हजार रुपये येणे होते. त्यासाठी कारखान्याने सिंडिकेट बँकेचा पाच कोटींचा धनादेश दिला होता.
खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे कंपनीने दिल्लीच्या न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व रणजित बोरावके यांना कंपनीला साडेसात कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आणि सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच्यामुळे माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.