मुंबई,दि.4: पाच राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Chhattisgarh Assembly Election 2023) छत्तीसगडसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. रायपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘छत्तीसगड 2023 साठी मोदींची हमी’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात जनतेला 20 आश्वासने देण्यात आली आहेत. या जाहीरनाम्यात भाजप (BJP) ने 500 रुपयांत गॅस सिलेंडर, एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, विवाहित महिलांना वार्षिक आर्थिक सहाय्य देण्याचंही घोषणापत्रात म्हटलं आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “हा केवळ भाजपचा जाहीरनामा नाही, तर एक संकल्प पत्र आहे. आमच्या संकल्पाची पूर्तता करून आम्ही 2000 साली छत्तीसगड राज्याची स्थापना केली.”
छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा
कृषक उन्नती योजना – 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धान्य खरेदी. प्रत्येक पंचायतीच्या कॅश काउंटरवर संपूर्ण एकरकमी मोबदला.
महतरी वंदन योजना – विवाहित महिलांना 12,000 रुपये वार्षिक आर्थिक मदत दिली जाईल.
भरती – एक लाख रिक्त सरकारी पदांवर भरती.
पीएम आवास योजना – मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 18 लाख लोकांना पीएम आवास योजनेअंतर्गत निधी दिला जाणार आहे.
तेंदूपत्ता संकलन – या अंतर्गत प्रति बॅग 550 रुपये आणि 4500 रुपयांपर्यंत बोनस दिला जाईल.
दीनदयाल उपाध्याय कृषी योजना – या योजनेअंतर्गत, भूमिहीन शेतमजुरांना दरवर्षी 10,000 रुपये दिले जातील.
आयुषमान भारत, स्वस्थ छत्तीसगड – या योजनेअंतर्गत राज्यातील लोकांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत.
यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा होणार आहेत. CGPSC घोटाळ्याची चौकशी.
छत्तीसगड उद्योग क्रांती योजना – या अंतर्गत तरुणांना 50 टक्के अनुदानासह बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
राज्य राजधानी क्षेत्र – रायपूर, नया रायपूर, दुर्ग आणि भिलाई नगरच्या विकासासाठी दिल्ली एनसीआरच्या धर्तीवर राज्य राजधानी क्षेत्र तयार केले जाईल.
इनोव्हेशन हब – नया रायपूर हे मध्य भारताचे इनोव्हेशन हब असेल. यामुळे 6 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
राणी दुर्गावती योजना – बीपीएल मुलींच्या जन्मावर दीड लाख रुपयांचे हमी प्रमाणपत्र.
गरीब कुटुंबातील महिलांना 500 रुपयांत गॅस सिलेंडर देण्यात येईल.
मासिक प्रवास भत्ता – विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी DBT मधून मासिक प्रवास भत्ता दिला जाईल.
भ्रष्टाचाराबाबत तक्रार निवारण आणि देखरेखीसाठी वेब पोर्टल.
एम्सच्या धर्तीवर प्रत्येक विभागात छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स उघडले जाईल आणि आयआयटीच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रत्येक लोकसभेत उघडली जाईल.
छत्तीसगडमधील गुंतवणुकीसंदर्भात दरवर्षी जागतिक दर्जाची परिषद आयोजित केली जाईल.
सरकार तुन्हार दुवार – या अंतर्गत पंचायत स्तरावर दीड लाख बेरोजगारांची भरती केली जाईल.
शक्तीपीठ प्रकल्प – चार धाम प्रकल्पाच्या धर्तीवर पाच शक्तीपीठांसाठी 1000 किमीचा प्रकल्प.
छत्तीसगडमधील लोकांना रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे.








