मुंबई,दि.२२: ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा नवा टीझर जारी करण्यात आला आहे. यातून शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अटीतटीचे प्रयत्न केले होते. अखेर मुंबई महापालिकेनं ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली. यंदाही शिवतीर्थ मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून रस्सीखेच सुरू होता. पण यंदाही शिवतीर्थ मैदान ठाकरे गटालाच मिळालं.
२४ ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थ मैदानावर पार पडणार आहे. याबाबतचा नवा टीझर ठाकरे गटाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे कुणाला लक्ष्य करणार? याचा अंदाज लावता येत आहे. या टीझरमधून ठाकरे गटाने शिंदे गटाला जोरदार लक्ष्य केल्याचं दिसत आहे. या टीझरमध्ये अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा शिंदे गटाचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला आहे. शिवाय “मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही” असा संदेशही या टीझरमधून देण्यात आला आहे.
ठाकरे गटाचा नवा टीझर
“काहीजण पळून जाणारे असतात.. शेपूट घालून बसणारे असतात.. स्वार्थासाठी इमान विकणारे असतात.. शत्रूंशी हात मिळवणारे असतात.. खाल्या ताटात थुंकणारे असतात.. खोक्यापायी विकले जाणारे असतात.. रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात.., पण मर्द विकला जात नाही.. मर्द गद्दारी करत नाही.. मर्दांचं एकच ठिकाण… शिवतीर्थ दादर.. एक नेता, एक विचार आणि एक मैदान.. दसरा मेळावा.. मर्दांचा मेळावा..,” असं ठाकरे गटाच्या टीझरमध्ये म्हटलं आहे.
मुंबईच्या दादर येथील शिवतीर्थ मैदानावर ठाकरे गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे.