मुंबई,दि.१६: गेल्या आठवड्यात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कठोर शब्दांत सुनावलं. “विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सांगा की ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत”, अशा शब्दांत न्यायालयानं फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं नवीन वेळापत्रक मंगळवारपर्यंत सादर करण्यासही सांगण्यात आलं आहे. त्यावरून सध्या चर्चा चालू असताना न्यायालयाच्या निर्देशांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने?
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेताना विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याची तक्रार विरोधकांनी याचिकेत केली होती. यावर सुनावणी घेताना न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं. “कोणत्या प्रकारचं वेळापत्रक ते न्यायालयाला सांगत आहेत. सुनावणीच्या वेळापत्रकाचा अर्थ सुनावणीत दिरंगाई करणे हा असू नये. नाहीतर विरोधी पक्षांची शंका बरोबर ठरेल”, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नमूद केलं.
“त्यांच्या कृतीतून त्यांनी असं दाखवायला हवं की ते हे प्रकरण गांभीर्यानं हाताळत आहेत. जून महिन्यापासून काय घडलंय? असा गोंधळ असता कामा नये. विधानसभा अध्यक्षांनी रोजच्या रोज ही सुनावणी घेऊन पूर्ण करायला हवी. आपण नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ असं ते म्हणू शकत नाहीत. सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ. कारण आमचे आदेश पाळले जात नाहीयेत. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या आधी निर्णय घेतला जायला हवा”, असंही सरन्यायाधीशांनी यावेळी सुनावलं.
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. “संविधानाला मानणारे नागरिक म्हणून आम्ही न्यायालयाच्या प्रत्येक प्रक्रियेचं आणि निर्णयाचं पालन करू. मी सगळ्या न्यायालयांचा मान राखतो आणि सगळ्या न्यायालयाच्या आदेशांचं पालन करतो”, असं ते म्हणाले.
मी संविधानाला मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी नक्कीच
“ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास असतो, संविधानावर विश्वास असतो त्यांनी संविधानाने स्थापन केलेल्या विविध संस्थांचा मान राखणं, आदर ठेवणं आवश्यक आहे. मी संविधानाला मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी नक्कीच कोर्टाच्या आदेशांचा आदर ठेवीन. पण विधिमंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचं सार्वभौमत्व कायम ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांचाही आदर राखणं तेवढंच आवश्यक आहे”, असंही राहुल नार्वेकरांनी नमूद केलं.