मुंबई,दि.११: Sanjay Raut Interview: दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने ठाकरे गटाची भूमिका मांडत असतात. रोज प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन सरकारला धारेवर धरतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टमधून रोखठोक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांसोबतचं त्यांचं नातं स्पष्ट केलं आहे. तसंच, शिवसेनेच्या भूमिकांबाबतही स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
“मी सामनात आलो त्या दिवसापर्यंत मला अग्रलेख लिहिण्याचा काहीच अनुभव नव्हता. बाळासाहेब दुसऱ्या दिवशी वाट पाहत होते. त्यांनी फोन करून शाब्बासकी दिली. लिखाण्याच्याबाबतीत मी कधीच माघार घेतली नाही. माझा लेखणीवर खूप विश्वास आहे. लेखणी आणि वाणीने क्रांती घडली. जेव्हा जेव्हा जगामध्ये कोणाला क्रांती करायची आहे, तेव्हा त्याने वृत्तपत्र काढलं. संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्र्यांनी मराठा काढला. देशात स्वातंत्र्याचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोवण्याकरता लोकमान्यांनी केसरी काढला. त्यामुळे मला अजूनही अनेक माध्यमं निर्माण झाली तरी ब्लॅक ॲण्ड व्हाईट कागद आणि पेन यावर विश्वास आहे. यातूनच क्रांती घडते, असं संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेबांचा सर्वाधिक सहवास मला मिळाला. बाळासाहेबांसह अत्यंत सामान्य नातं होतं. त्या पद्धतीने राहिलो. बाळासाहेबांसोबत चर्चा व्हायची. अग्रलेखावर चर्चा व्हायची नाही. अनेकदा ते सकाळी अग्रलेख वाचायचे. आवडलं तर पाठ थोपटायचे. खूप वेळा रागावले. वडिल रागवातातच. पण जाहीर सभांमधून कौतुकही करायचे, असं संजय राऊत म्हणाले.
आम्ही बसलेलो असताना कोणी प्रमुख लोक आले ओळख करून द्यायचे. माझे सह संपादक संजय राऊतांना भेटा. व्हेरी फायर एडिटर. आग आहे आग म्हणायचे. असं विशाल मन होतं. जाहीर सभांतून कौतुक केलं आहे. नेता असतो आपल्या सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. आपल्या सहकाऱ्यांना घडवतो, असंही संजय राऊत म्हणाले.
एखादा बाण सुटला ना मग… | Sanjay Raut Interview
बाळासाहेबांकडून मी बेडरपणा शिकलो. एखादा बाण सुटला ना मग मागे घेणार नाही. हे आम्ही प्रामुख्याने घेतलं ते बाळासाहेबांकडून घेतलं. मागे नाही फिरणार, गेलो पुढे आता, असं ते म्हणाले.
ही शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही
कोणताही पक्ष किंवा संघटना हे तुम्ही तो मूळ निर्माता असतो त्याची भूमिका आणि विचार अनेक पिढ्यांना घेऊन पुढे जात असते. काँग्रेस कोणी स्थापन केली? ती काँग्रेस आज आहे का? स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेस. हजारो लोक तुरुंगात गेले. घरां-दारांवर तुळशीपत्र ठेवले. लोक फासावर गेले, ती काँग्रेस. पण आता पक्ष बदलत गेला. राजकारण बदलत गेलं. तशीच शिवसेना आहे. ज्या मूळ कारणासाठी शिवसेना स्थापन झाली, ती परिस्थितीही बदलत गेली. मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी कोकणी म्हणत होतात, भिकारी म्हणत होतात. मराठी माणसाला प्रतिष्ठा नव्हती. आज बाळासाहेबांनी ५० वर्षांत अथक प्रयत्नांना कष्टाने ही प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानंतर काही प्रश्न कमी झाले. पण संघटना तीच आहे. बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. शेवटपर्यंत ती बाळासाहेब ठाकऱ्यांची राहील. ही शिवसेना उद्धव ठाकरेंचीही नाही. उद्धव ठाकरे म्हणतात ही शिवेसना माझी नाही. ही शिवसेना बाळासाहेबांची. आम्ही सगळे या प्रवाहात आहोत तो बाळासाहेबांचा विचार घेऊन प्रवाहात आहोत. आमचा आत्मा आहे त्यामध्ये.