मुंबई,दि.१०: Raj Thackeray On Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे प्रतिक्रिया दिली आहे. केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. खासकरुन महिला वर्गाच्या मनात या सिनेमाने घर केलं आहे. सचिन तेंडुलकरलाही हा सिनेमा पाहण्याचा मोह आवरता आला नाही. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. राज ठाकरेंनी नुकताच हा सिनेमा पाहिला.
राज ठाकरेंची प्रतिक्रिया | Raj Thackeray On Baipan Bhaari Deva
‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावून गेले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चित्रपट पाहिल्यानंतर मी घरी येऊन पत्नीला म्हणालो की हा फक्त बायकांनी पाहण्याचा सिनेमा नाही. हा चित्रपट पुरुषांनीही पाहायला हवा. महिला कोणत्या परिस्थितीतून जात असतात, ही गोष्ट पुरुषांनी समजून घेण्याची गरज आहे. महिलांना चित्रपट पाहताना स्वत:ला रिलेट करणं हे साहजिक आहे. पण, त्यातील काही चुकीच्या गोष्टी महिलांच्या आयुष्यातून बाजूला करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी हा सिनेमा पुरुषांनी पाहणं जास्त आवश्यक आहे. बाईपणचं यश हे यातचं आहे, असं मला वाटतं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
केदार शिंदेंनी राज ठाकरेंचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी “सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची “मनसे” प्रतिक्रिया…’बाईपण भारी देवा’ सिनेमा पाहिल्यावर त्यांचं म्हणणं तेच आहे, जे मी सिनेमा सादर करताना मांडलं. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मात्र आता त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची वेळ पुरूषाची आहे. तीचं मन समजून घेण्यासाठी तिच्या सोबत थिएटर मध्ये जाऊन पहा…” असं कॅप्शन दिलं आहे. केदार शिंदेंनी पुरुषांसाठी खास ऑफर आणली आहे. ११ ऑगस्टपासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं तिकिट पुरुष प्रेक्षकांना १०० रुपयांत मिळणार आहे.