मुंबई,दि.10: राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना-भाजपची युती उद्धव ठाकरे यांनीच तोडली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत हे विधान केलं होतं. मोदी यांच्या या विधानाचं सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते गिरीश महाजनांपर्यंत सर्वांनीच समर्थन केलं आहे. मोदी यांनी दिलेली माहिती बरोबर असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या नेत्यांचं म्हणणं खोडून काढलं आहे. युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
…तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे मीडियाशी संवाद साधत होते. भाजप – शिवसेनेची युती तुटली त्यावेळेस गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. त्यावेळी गिरीश महाजन यांचा कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्या कालखंडातील दिल्लीच्या कोर कमिटीच्या बैठकीला महाजन यांना बोलावल्या जात नव्हतं. त्यावेळी भाजपची सूत्र मी विरोधी पक्षनेते असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. त्यामुळे मधल्या कोणत्याच गोष्टी महाजन यांना माहिती नव्हत्या, असं सांगतानाच कमीत कमी माहिती घेऊन त्यांनी बोलायला हवं, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.
जनतेला माझ्यावर विश्वास
महाराष्ट्रातील माझी विश्वासहार्यता अजून संपलेली नाही. जनतेला माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ दिलेला नाही. कापसाला भाव देईन, जळगावचा विकास करेल अशी आश्वासने मी काही दिली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
…त्यामुळे महाराष्ट्रातील तुमची लाचारी दिसून येते
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ज्यांना हे कालपर्यंत भ्रष्ट म्हणत होते, नॅशनल करप्ट पार्टी म्हणून म्हणत होते, आज गिरीश महाजन यांचे नेते त्यांच्यासोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतात. त्यामुळे आता कुठे नैतिकता राहिली आहे, असंही ते म्हणाले. आम्हाला नैतिकता शिकवू नये. करप्ट पार्टीसोबत तुम्ही युती करून जवळ आलात. त्यामुळे महाराष्ट्रातील तुमची लाचारी दिसून येते, असंही ते म्हणाले.
मुनगंटीवार यांना अर्धवट माहिती
यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची मतेही खोडून काढली. सुधीर मुनगंटीवार यांना अर्धवट माहिती आहे. शिवसेनेने जागा वाढवून द्या अशी मागणी केलेलीच नव्हती. कारण शिवसेनेकडे 171 जागा होत्या. भाजपाच्या 117 जागा होत्या. त्यावेळी वातावरण आपल्या बाजूला आहे, असं भाजपला वाटलं. त्यामुळे युतीत जागा वाटपाची चर्चा करताना भाजपने 145 जागांची मागणी केली. थेट 117 वरून 145 जागांची मागणी केली होती. पण काही जागा देण्यास शिवसेनेने विरोध केला होता.
त्यामुळे युतीत तणाव झाला. भाजपलाही तेच हवं होतं. कारण स्वबळावर लढण्याची भाजपची रणनीती आधीच ठरलेली होती. या रणनीतीत मीही सहभागी होतो. त्यानंतर सर्वानुमते युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असं खडसे यांनी सांगितलं. भाजपने युती तोडली नाही, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यांचा हा मुद्दा खोडून काढताना खडसे यांनी ही माहिती दिली.