या संघटनांनी समीर वानखेडे यांच्या विरुद्ध केली तक्रार, केली ही मागणी

0

मुंबई,दि.४: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी धर्म बदलून नोकरी मिळविल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. वानखेडे यांच्याविरुद्ध आता दोन दलित संघटनांनी दंड थोपटले असून वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप होत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या संघटनांनी तक्रारीद्वारे केली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक हे सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत आहेत. वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी जातीचं बनावट प्रमाणपत्र बनवलं. मुस्लिम असतानाही मागासवर्गीय प्रवर्गातील जात असल्याचे त्यांनी दाखवले. त्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवली व मागावर्गीयांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक आपल्या आरोपांवर ठाम असतानाच भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी या दोन दलित संघटनांनी आता समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. या दोन्ही संघटनांनी मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल केली आहे.

‘समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा खोटा व चुकीचा दाखला मिळवून त्या आधारावर सरकारी नोकरी मिळवली असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याबाबत चौकशी करण्यात यावी व पडताळणीत वानखेडे यांचा दाखला खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यास तो रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे. बुधवारी (३ नोव्हेंबर) ही तक्रार करण्यात आली आहे. भीम आर्मी ही चंद्रशेखर आझाद (रावण) यांची संघटना आहे.

समीर वानखेडे हे दलित आहेत की मुस्लिम आहेत, यावरून हा वाद सुरू आहे. मात्र, याबाबतचे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळलेले आहेत. वानखेडे यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडेही आपली कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्याआधी मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मुंबईत वानखेडे कुटुंबाची भेट घेतली होती व वानखेडे यांचे समर्थन केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here