मुंबई,दि.13: Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एका केमिकल टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो रस्ता दुभाजकाला धडकला. यामध्ये केमिकलने पेट घेतल्याने संपूर्ण टँकर जळून खाक झाला आहे. तर पेटत्या टॅकरमधून केमीकल व आगीचे लोट पुलाच्या खाली पडले व पेट घेतला. या घटनेत एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत पुलाच्या खाली व पुलाच्या वर दोन्हीकडे आगीचे मोठमोठे लोट उसळले होते. आगीची माहिती समजताच लोणावळा शहर पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा व इतर सामाजिक संघटनांचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अखेर 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. चार ते पाच तास एक्स्प्रेसवरील वाहतूक ठप्प होती. अखेरीस धीम्या गतीने वाहतूक सुरू झाली आहे.
जखमीवर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोणावळा विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व महामार्गच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. नागरिक देखील मोठ्या संख्येने जमले होते. मयत व्यक्तीपैकी दोन जण कुणेगाव येथील स्थानिक असून उर्वरित दोन जण टँकरमधील आहेत.