नागेश ऑर्केस्ट्रा डान्सबारवर छापा; रोकडसह ४९ लाखांचा ऐवज जप्त

0

सोलापूर,दि.३१: विजापूर रस्त्यावरील सोरेगाव येथे असलेल्या नागेश बारवर शहर पोलिसांनी छापा टाकून १२ नृत्यांगना व ३० लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कार व दुचाकीसह सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सहायक पोलीस आयुक्त टिपरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, चार पोलीस कर्मचारी व त्यांनी साध्या गणवेशात व खासगी वाहनातून नागेश ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली. त्यावेळी काही नृत्यांगना या पुरुष ग्राहकांशी लगट करून हिंदी चित्रपट गीतांवर बीभत्सपणे नृत्य करून अश्लील चाळे करून ग्राहकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. त्यावेळी लोक नृत्यांगनाच्या अंगावर नोटा उडवित असल्याचे दिसले.

पोलिसांनी कॅश काऊंटरवर जाऊन म्युझिक सिस्टीम बंद केली. सदर बारच्या तळमजल्यावरही असाच प्रकार सुरु होता. या कारवाईमध्ये डॉ. टिपरे यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ व संजीव भोसले यांना पोलीस कर्मचाऱ्यांसह बोलावून घेतले. यावेळी ३० पुरूष आरोपी व १२ नृत्यांगनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ११ हजारांची रोकड, २५ मोबाइल हॅन्डसेट, दोन लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५१ हजारांचा ऐवज तसेच ४४ लाख ९५ हजारांची चारचाकी वाहने, १५ दोनचाकी वाहने असा एकूण ४९ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी आठ नृत्यांगना व १० ते १५ इसम पळून गेले आहेत.

या प्रकरणी बारमालक सुनील सुरगीहळ्ळी (रा. यामिनीनगर, विजापूर रस्ता), व्यवस्थापक मंजुनाथ जाधव (रा. सेंटलमेंट फ्री कॉलनी नं. ६) यांच्यासह ३० जण व १२ नृत्यांगनांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले. तर नागेश बार पोलिसांनी सील केले.

परराज्यातील नृत्यांगना

राजस्थान, गुजरात, कोलकाता, गडचिरोली, मुंबई, चेन्नई आदी ठिकाणच्या १२ नृत्यांगनांना ताब्यात घेतले. यापूर्वीही नागेश बारवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे ऑर्केस्ट्रा बार व डान्सबारचा परवाना निलंबित करण्यासाठी वरिष्ठांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here