सोलापूर,दि.22: Ashok Nimbargi Joins Congress: सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक निंबर्गी (Ashok Nimbargi) यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेत भारतीय जनता पक्षातील देशमुशाहीवर जोरदार हल्ला चढवला. या हूकुमशाहीला कंटाळून पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक निंबर्गी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश | Ashok Nimbargi Joins Congress
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृती निमित्त रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात शहर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात प्रा. निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात अधिक्रुत प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा झेंडा त्यांच्या हाती देऊन स्वागत केले. जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात,आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भाजपचा त्याग करुन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रा. निंबर्गी यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर कडाडून टीका केली. भाजपात दोन्ही आमदारांची हुकूमशाही सुरु आहे. वाजपेयी अडवाणींची विचारधारा या पक्षात राहिलेली नाही. निवडणूक आली की जनतेला खोटी आश्वासने देणारा जाहिरनामा तयार करण्याचे आदेश दिले जातात. भाजपात स्क्रिप्टेड लोकशाही आहे. हुकूमशाही आदेशाची लोकशाही पध्दतीने अंमलबजावणी करणारा भाजप जगातला एकमेव पक्ष आहे अशी मार्मिक टीकाही निंबर्गी यांनी केली.
देशमुखांची कार्यपद्धती अडवा आणि जिरवा
स्थानिक दोन्ही आमदारांवरही त्यांनी तोंडसुख घेतले. यांची कार्यपद्धती अडवा आणि जिरवा अशी आहे. आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून आमदारांनी आपल्याच पक्षाच्या महापौरांचा पदोपदी अपमान केला आहे. प्रदेशाकडे तक्रार केली पण ते लोक लक्ष देत नाहीत. त्यांनी सांगितले तरी कुणी ऐकत नाही. भाजपात माझ्यासारख्या अनेकांची घुसमट सुरु आहे. विद्यमान खासदारही वैतागले आहेत. कशाला पडलो या फंदात अशी पश्चातापाची भाषा त्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.
काय म्हणाले अशोक निंबर्गी?
मी काही मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षात आलो नाही. जर एखाद्याच्या स्वाभीमानाला धक्का लावला जात असेल तर हिशेब चुकता केला पाहिजे, म्हणून मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, असेही निंबर्गी म्हणाले.
गेली अनेक वर्षे कोळी समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रणिती शिंदे विधीमंडळात सातत्याने प्रश्न लावून धरतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निंबर्गी यांनी भाषणाचा समारोप करताना केली.
सुशीलकुमार शिंदे यांनी केले कौतुक
यावेळी नाना पटोले तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातुन प्रा. अशोक निंबर्गी यांच्या धाडसाचे कौतुक केले. बाळासाहेब थोरात यांनी चेतन नरोटे आणि प्रा. अशोक निंबर्गी या जोडीचा उल्लेख ग्रामीण शैलीत खिलार जोडी असा केला. निंबर्गी हे दबलेल्या समाजाचे नेतृत्व करतात. त्यांची झेप वाघासारखी आहे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.