सोलापूर, दि.23: Solapur Banner: सोलापुरात लावलेले राजकीय बॅनर असो किंवा पाट्या या हटकेच असतात. आणि त्याही सोलापुरी शैलीत असतात. नुकतेच यापूर्वी लावलेल्या पाटीची (फलक) तुफान चर्चा झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यात पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना खड्याचा अंदाज येत नाही. खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होतात. शहरातील अनेक नगरातील रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार आश्वासने देतात. मात्र प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर त्या आश्वासनांचे काय होते हे सर्वश्रुत आहेच.
सोलापुरातील एका परिसरातील नागरिकांनी आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सध्या याचा एक फोटो व्हायरल होत आहे. सोलापुरातील एका परिसरात नागरिकांनी फलक लावून लोकप्रतिनिधींना चांगलेच खडसावले आहे. या परिसरात पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे, त्या शेजारी “जाहीर विनंती, येत्या मनपाच्या निवडणुकीत मतदान करताना, या खड्ड्याची आठवण ठेवा” असा फलक लावला आहे. शहाण्यांना शब्दाचा मार म्हणतात, आता तरी लोकप्रतिनिधी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सोलापूरकरांच्या या फलकामुळे (पाटी) सोलापूरकर पाट्या लावण्यात सगळ्यात भारी ठरले आहेत.

सोलापुरात आणखी एका लावलेल्या फलक चर्चेचा विषय ठरला आहे. आता सोलापूरमधील पाळीव कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला वैतागून सोलापुरात लागलेल्या ‘ या ‘ फलकाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. कुत्र्याला वैतागलेले लोक या बॅनरचे कौतूक करत आहेत.
काय आहे बॅनर? | Solapur Banner
सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एका अनोख्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मॉर्निंग वॉकला कुत्र्याला घेऊन येणाऱ्यांविरोधात खोचक बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमध्ये म्हटले आहे की, “शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये” अशा आशयाचा लावलेला फलक सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराभोवती वॉकिंग ट्रॅक हा फलक लावण्यात आला आहे. या वॉकिंग ट्रॅकवर सकाळापासून लोक व्यायम करण्यासाठी व धावण्यासाठी येतात. परंतु कुत्र्यांमुळे ट्रॅकवर घाण होत असल्यामुळे सर्वच जण नाराजी व्यक्त करत होते. अखेरी एका हुशार व्यक्तीने या पद्धतीचे बॅनर लावले.
मंदिराभोवती असलेल्या ट्रॅकवर पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु वॉकिंगला येताना काही नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात. त्यामुळे वॉकिंग ट्रॅकवर अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने एका अज्ञात व्यक्तीने ही बॅनरबाजी केली आहे. या अनोख्या फलकाबद्दल बद्दल सोलापूरकरांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे. या फलकानंतर तरी कुत्रे मालक शाहणे होतील का? अशी चर्चा रंगलीय.