मुंबई,दि.26: दाऊद (समीर) वानखेडे यांनी माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा असे मी आव्हान देतो असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी म्हटले आहे. ड्रग्ज प्रकरणी होणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अनेक कारवाया बोगस असल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून नवनवे गौप्यस्फोट सुरू केले आहेत. मलिक यांनी आज एनसीबीच्या एका अधिकाऱ्याचं पत्र सोशल मीडियात व्हायरल करून खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी (NCB) अधिकारी सचिन वानखेडे (Sachin Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी एक पत्रही ट्विट केलं आहे जे एनसीबीतील एका अज्ञात अधिकाऱ्याकडून त्यांना प्राप्त झाले आहे.
समीर वानखेडे हे खंडणीखोर अधिकारी असून ते भाजपच्या काही लोकांच्या सांगण्यावरून बॉलिवूडमधून वसुली करतात, असा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला होता. आता एनसीबीच्या अधिकाऱ्याचं हे पत्र मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना दिलं आहे. दिल्ली एनसीबीकडून सध्या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे. ती चौकशी करताना या पत्राचाही विचार व्हावा, अशी विनंती मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी म्हटलं, एनसीबीच्या विरोधात आमची लढाई एनसीबीच्या विरोधात नाहीये. एनसीबीने गेल्या काही वर्षांत खूप काही चांगले काम केले आहे. एनसीबी चांगले काम करत आहे. मात्र एक व्यक्ती बोगस प्रणापत्रावर नोकरीत आला. मागील दोन दिवसांपासून समीर वानखेडे यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 6 तारखेपासुन आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. असं म्हटलं जातंय की, सर्व कुटुंबाला याला खेचले जात आहेत पण आम्ही असे केले नाही. यात हिंदू – मुस्लिम मी आणले नाही, मी कधीही धर्माच्या नावावर राजकरण केलं नाही. ख्रिचन आणि मुस्लीम यांनी धर्म बदलला तर जात समाप्त होते.
या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे… ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली कशी झाली, याचा तपशील पत्रात आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास एनसीबीकडं सोपवण्यात आल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन संचालक राकेश अस्थाना यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगून वानखेडे यांना विभागीय संचालक पदी नेमले होते. बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिलं गेलं होतं. गुन्हे दाखल होताच कोट्यवधी रुपये वसुली केली गेली. त्यातील वाटा राकेश अस्थाना यांनाही मिळाला होता. दीपिका पादुकोन, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांच्याकडून पैसे घेतले गेले. अयाज खान नामक वकिलानं है पैसे गोळा केले. हा अयाज खान समीर वानखेडे यांच्या वतीनं बॉलिवूडमधून पैसे गोळा करतो. एनसीबी कार्यालयात त्याचा मुक्त वावर असतो. खंडणी गोळा करून देण्याच्या बदल्यात समीर वानखेडे अयाज खानला बॉलिवूड कलाकारांचं वकीलपत्र मिळवून देतो, असा आरोप मलिक यांनी पत्राच्या आधारे केला आहे.