मुंबई,दि.5: ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच्या बैठकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Uddhav Thackeray Prakash Ambedkar) यांची बैठक होणार असल्याचे वृत्त होते. मुंबईतील फोर सिझन हॅाटेलमध्ये बैठक होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी हे वृत्त फेटाळले असून आज कोणतीही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
शिवसेनेचे हिंदुत्व मान्य: प्रकाश आंबेडकर
शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन राजकीय रणनीती आखली जात आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती त्यातच शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणत ठाकरेंसोबतच युतीचे स्पष्ट संकेत दिले. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचे म्हटले होते.
सकारात्मक चर्चा होत आहे: प्रकाश आंबेडकर
त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा सगळ्यांना याची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून सकारात्मक चर्चा होत असल्याचे त्यांनी म्हटले.
शिवसेनेसोबत युती करण्यास तयार: प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, शिवसेनेसोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, त्यातील अधिक तपशीलाबाबत चर्चा सुरू आहेत. आपण काही दिवसांपासून ईशान्य भारताच्या भेटीवर होतो. रविवारी मुंबईत दाखल झालो आहे. आज कोणतीही बैठक नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. एकदा युती करण्याबाबत जाहीर घोषणा झाल्यानंतर त्यात कोणतीही लपवाछपवी करण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले.
महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने बैठक
महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक आहे. या बैठकीसाठी आपण जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याशिवाय इतर कोणतीही बैठक नसल्याचे त्यांनी सांगितले.