उद्धव ठाकरे गटाने पक्षासाठी चिन्ह आणि नावे केली निश्चित, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

0

मुंबई,दि.9: उद्धव ठाकरे गटाने पक्षासाठी चिन्ह आणि नावे केली निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Bow And Arrow) आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नावे आणि चिन्हाबाबत माहिती देण्याची मुदत दिली आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी सुचवलेल्या नावात ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून शिवेसना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावे सुचवण्यात आली आहेत. ठाकरे गटाने आणि शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा केला आहे. दोन्ही गटांनी केलेल्या दाव्यामुळे निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवले जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे चिन्ह?

शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह पोहचवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here