मुंबई,दि.21: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्याचं नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर करुन अनेक पोलिसांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराचा शोध महाराष्ट्र सायबर पोलीस घेत आहेत.
मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचा फोटो आणि नाव वापरुन कोणीतरी व्हॉट्सॲप चालवत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या व्यक्तीने अनेक पोलिसांना मेसेज करुन ॲमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करुन पाठवण्यास सांगितले. ही बाब दाते यांना समजताच त्यांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि महाराष्ट्र सायबर सेलला तपास करण्यास सांगितलं.
महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, “आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. हा आरोपी पोलीस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतो.”
“हा सायबर गुन्हेगार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोटो, बनावट मोबाईल नंबर वापरुन व्हॉट्सअॅप चालवत आहेत आणि ते त्या नंबरचा वापर करुन त्या विभागातील सर्वात कनिष्ठ लोकांना अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी आणि त्यांना त्वरित पाठवण्यासाठी मेसेज पाठवत आहेत,” असं संजय शिंत्रे यांनी पुढे सांगितलं.
शिंत्रे म्हणाले की, “एखाद्या कर्मचाऱ्याने एकदं गिफ्ट कार्ड खरेदी केलं आणि ते त्या नंबरवर पाठवलं की त्याचा वापर फ्रॉड शॉपिंगसाठी करतात किंवा त्याचं रोख रकमेत रुपांतर करतात. महाराष्ट्रात अशी 144 प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोटो वापरुन बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइल तयार करुन आपल्या कनिष्ठांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.”
गुन्हेगार असे होतात यशस्वी
बर्याच वेळा सरकारी खात्यांमध्ये विशेषत: पोलीस विभागात काम करणारे कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी प्रोटोकॉलमुळे त्यांच्या वरिष्ठांशीथेट बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुन्हेगाराने त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या नावाने मेसेज केला तर त्यांना आनंद होतो. वरिष्ठांनी त्यांच्याकडून काहीतरी मागितलं आहे याने हरखून जातात. वरिष्ठांच्या नजरेत चांगले स्थान निर्माण होईल, असा विचार ते करतात. परंतु ते गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात हे त्यांना कळत नाही, असं पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी नमूद केलं.
अशी करतात फसवणूक
शिंत्रे यांनी सांगितलं की, आपण मीटिंगमध्ये आहे आणि खूप व्यस्त असल्यामुळे ते अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही, असा मेसेज गुन्हेगार कनिष्ठांना करतात. हे ठक त्यांच्या मेसेजमध्ये लिहितात की आपल्याला हे गिफ्टकार्ड लवकरात लवकर हवं आहे आणि 5 ते 10 हजार रुपयांचे गिफ्ट कार्ड विकत घेण्यास सांगून ते तातडीने पाठवून देण्यासाठी सांगतात, जेणेकरुन कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्याला ही गोष्ट कोणाकडून तरी तपासावी लागण्यासाठी वेळ मिळू नये आणि तोपर्यंत त्याची फसवणूक होईल.