Prophet Comment Row: पैगंबरांवरील टिप्पणीच्या वादावर सोलापूरसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने

0

सोलापूर,दि.10: Prophet Comment Row: भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबरावर केलेल्या वक्तव्याविरोधात आज महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, जालनासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या नमाजानंतर हे आंदोलन सुरू झाले.

शुक्रवारच्या नमाजा नंतर भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक, दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर निदर्शक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमुळे लोकांनी दुकाने बंद केली. त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

या संपूर्ण घटनेवर जामा मशिदीच्या शाही इमामाने म्हटले आहे की, मशिदीने निषेध जाहीर केला नव्हता. “आम्हाला माहीत नाही की याची सुरुवात कोणी केली. शुक्रवारच्या नमाजा नंतर काही लोकांनी घोषणाबाजी केली आणि मोठा जमाव जमला. ते लवकरच शांत झाले. आता सर्व काही ठीक आहे,” असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील संवेदनशील अशा सोलापूर, औरंगाबाद, परभणी, जालन्यात हजारोंच्यां संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले. 

सोलापूरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर, औरंगाबादमध्येही शेकडोंच्या संख्येने जमाव विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून अनेक मुस्लिम संघटनांनी त्याचा निषेध व्यक्त केला. त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापुरात एमआयएमने भव्य मोर्चा काढला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर मुस्लिम बांधवांनी प्रचंड मोठी गर्दी केली असून नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे.

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालविरोधात दिल्लीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबादसह लुधियाना आणि तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुस्लिम समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन झाले. प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. गेल्या एका तासापासून विविध परिसरात दगडफेक सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here