स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक संपन्न, उजनी पाईपलाई बाबत घेण्यात आला हा निर्णय

0

सोलापूर,दि.7 : स्मार्ट सिटीचे चेअरमन असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. बैठकीत उजनी दुहेरी पाईपलाईनची निविदा नव्याने मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला चेअरमन गुप्ता, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ऑनलाईन उपस्थित होते. नियोजन भवन येथे महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, केंद्र सरकारचे प्रतिनिधी पी.सी. धसमाना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, शहर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

गुप्ता यांनी उजनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियमानुसार किमान तीन ठेकेदार निविदा प्रक्रियेत सामील होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाच्या निविदेमध्ये दोन ठेकेदार सामील झाल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या त्रिस्तरीय समितीला निर्णय घेण्याचे अधिकारी दिले.

एकात्मिक नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून याबाबतची निविदा मंजूर करण्याचा निर्णयही झाला आहे. याबाबतच्या दुरूस्त्या पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांनी 15 जूनपर्यंत कराव्यात, असे गुप्ता यांनी सांगितले.

स्टेडिअममध्ये अंतर्गत सुधारणा करणे, खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था याबाबतचा एकत्रित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही श्री. गुप्ता यांनी दिल्या. यावेळी नूतन पोलीस आयुक्त श्री. हिरेमठ यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here