नवी दिल्ली,दि.२: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Saytendar Jain) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील आरोपांबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो की, त्यांना एक-एक करून तुरुंगात टाकण्याऐवजी तुम्ही सर्व आपच्या मंत्री, आमदारांना एकत्र तुरुंगात टाका. सर्व एजन्सींना सर्व तपास एकत्र करण्यास सांगा. तुम्ही एक एक मंत्र्याला अटक करता, त्यामुळे जनतेच्या कामात अडथळा येतो.
सत्येंद्र जैन यांना ईडीने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. या संदर्भात केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, ज्यात ते म्हणाले की, “मला वाटते की सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकून हे लोक दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात चांगले काम करत आहेत, त्यांना थांबवायचे आहे, पण काळजी करू नका, मी तसे होऊ देणार नाही. सर्व चांगले काम चालूच राहील.”
ते पुढे म्हणाले की, आता मनीष सिसोदिया यांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू आहे. ते म्हणाले की, “मी काही महिन्यांपूर्वीच सांगितले होते की केंद्र सरकार सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात अटक करणार आहे. मला विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे की मनीष सिसोदिया यांनाही लवकरच अटक केली जाऊ शकते. त्यांच्याविरुद्ध खोटे खटले तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
ते पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया हे भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक आहेत, कदाचित ते स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये 18 लाख मुले शिकतात, मनीषजींनी या मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा दिली आहे, मला माहित नाही जैन, सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यामागे काय राजकारण आहे, याने देशाचेच नुकसान होईल.