दि.२८: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतले यावर बोलताना महत्वाचे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (दि.२७) पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रवेश न करता बाहेरूनच दर्शन घेतले.
यामागील कारण राष्ट्रवादीने सांगितले आहे. शरद पवार मंदिरात का गेले नाहीत याचे कारण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. “शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
“प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. गेलं तर म्हणायचं का गेले. नाही गेलं तर म्हणायचं हे नास्तिक आहेत. हे तुम्ही दाखवायचं बंद केलं की बोलणारेही बंद होतील. असलं बोलणाऱ्यांच्या वर तुम्ही बॅन आणला पाहिजे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. माध्यम प्रतिनिधींशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“अजित पवार जरी बोलले तरी त्यांच्यावर बॅन आणा. मिटकरी तर बाजूला राहू द्या. अनेक जण शाकाहार मांसाहार करतात. जर मांसाहार करणारी व्यक्ती एका रस्त्यानं जयला लागले आणि कोणी म्हटलं एखाद्या ठिकाणी आपण दर्शनाला जाऊ. काही जण मनात ठेवतात कोणाला सांगत नाहीत, तर काही जण बोलून दाखवतात त्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या मी केल्या नाहीत. केवळ मंदिराच्या आतच जाऊन माथा टेकला तर खरं दर्शन, कधीकधी तर पंढरपूरला आपण पायरीचं दर्शन घेतो” असंही त्यांनी स्पष्ट केलं.