सोलापूर,दि.३०: मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावातून उपोषणकर्ती मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण, कॅन्डल मार्च, मुंडन आंदोलन सुरू आहेत .
उपोषणकर्ता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नान्नज (ता. उत्तर सोलापूर) सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने दि.२७ सकाळ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी नान्नजच्या उपसरपंचासह सकल मराठा समाजाच्या ७ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे दिला आहे.ग्रामपंचायत बाजूला सुरू असलेल्या साखळी उपोषण स्थळी सकल मराठा समाज बांधव यांच्या उपस्थितीत सोमवारी नान्नज उपसरपंच ज्योती दडे, ग्रामपंचायत सदस्या अरुणा गवळी, ग्रा.पं. सदस्या सोनाली गवळी, ग्रा.पं.सदस्या अश्विनी गवळी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चोरेकर, ग्रा.पं. सदस्य विश्वजीत भोसले, ग्रा.पं सदस्य विनोद माने यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा सरपंच राणी टोणपे व ग्रामसेवक गंगाधर कांबळे यांच्याकडे दिला असून तो मंजूर करण्यात यावा अशी ही विनंती करण्यात आली आहे. तर सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा आयोजित करण्यात आली होती मराठा समाज मागणीसाठी राजीनामा दिलेल्या उपसरपंचासह, ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेला गैरहजेरी लावली.
यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही.,अशा घोषणा मराठा समाज बांधवांनी घोषणा दिल्या. यावेळी सकल मराठा समाज बांधवांसह नागरिक उपस्थित होते. रविवारी रात्री मराठा आरक्षण मागणीला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. मराठा समाजातील महिलांनी गावात कँन्डल मार्च काढला.तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्य निषेधार्थ पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षण मागणीला मुस्लिम समाजाचा पाठिंबा
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज मध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. मराठा समाज आरक्षण मागणीला व साखळी उपोषणाला मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबाचे पत्र देण्यात आले. यावेळी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शाब्बिर मुजावर मक्का मशीदट्रस्टचे अध्यक्ष नशिर शेख, मंजूर शेख, शाबाझ काझी, शिदायक शेख, सलीम अन्सारी, आब्बास शेख,मौलाना शेख व इतर मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.