आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात 1 वारकरी ठार 30 जखमी

0

सातारा,दि.19: आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात 1 वारकरी ठार 30 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग 47 वरील सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीतील पुणे थांब्याजवळ आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या आयशर टेम्पोने कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथील दिंडी सोहळ्यातील ट्रँक्टर ट्राँलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत 11 वारकरी किरकोळ जखमी झाले आहे. या अपघातामध्ये मायप्पा कोंडिबा माने (वय 45, रा,भादोले ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मारुती भैरवनाथ कोळी (वय 40,रा.लाहोटे ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ) हे मृत्यूशी झुंज देत आहेत. सदरील घटना रविवार दि.19 जून रोजी मध्यराञी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या श्री. भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी क्रं.1 व 7 हा दिंडी सोहळा पंढरपूर पायी वारी करणेकरीता आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता आळंदी येथे ट्रँक्टर (क्रं- एमएच-10-ay-5705) ट्राँलीमधून प्रवास करीत होते. यावेळी सदरील ट्रँक्टरला दोन ट्राँल्या जोडलेल्या होत्या.यामध्ये महिलांसह 43 वारकरी ट्रँक्टर ट्राँलीमध्ये आळंदीकरीता प्रवास करीत होते. दरम्यान,ट्रँक्टर ट्राँली सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर  खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून तरकारी घेऊन पुणेकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (क्रं.एमएच-45-एएफ-2277) वरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या विदयुत खांबाला जोरदार धडक दिली.

तसेच, महामार्गावरुन दिंडी सोहळ्याकरीता निघालेल्या ट्रँक्टर ट्राँलीलाही पाठीमागून जोरदार धडक दिली. हि धडक ऐवढी जोरदार होती की, धडकेनंतर टेम्पो महामार्गावर जोरदार पलटी होत ट्रँक्टर ट्राँलीमधील वारकरी महामार्गावर हवेत उडत गंभीर जखमी झाले तर ट्रँक्टर ट्राँलीच्या पाठीमागील ट्राँलीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यावेळी, ट्राँलीमधील लोखंडी बार मायप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. 

अपघातामध्ये भादोले,लाहोटे येथील इंद्रजित पांडुरंग पाटील(वय 50), बाळासो ज्ञानू तावडे, प्रमिला वसंत पाटील(वय 55), शिवाजी दत्तू सलगर(वय 72), यशवंत सुराप्पा शिंदे (वय 67), कृष्णात उर्फ बाप्पू यादव(वय 55), शिवाजी माने(वय 70), भिकाजी सखाराम माने ,महिपती महादेव पाटील (वय 65),सचिन रामचंद्र नांगरे(वय36), शिवाजी यशवंत नांगरे(वय70), आनंदा युवराज माने(वय45), रघुनाथ भैरु माने(वय 48), शिवाजी धोंडिराम येडके(वय50), महादेव ज्ञानू पाटील(वय 65),रमेश राजाराम पाटील(वय 57), शोभा नाना माने(वय40), वसंत लखु माने (वय 60),तानाजी राजाराम तावडे(वय 47), विमल बाळासो तावडे(वय 60), कल्पना पाटील(वय50), विलास आनंदा पाटील (वय65) व इतर दोन वारकरी असे तीस वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत.

यावेळी संबंधितांना तातडीने उपस्थित युवकांच्या व नागरिकांच्या मदतीने शिरवळ पोलीसांनी पुणे जिल्ह्यातील किकवी व सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील 108 रुग्णवाहिकेमधून व खाजगी रुग्णवाहिकेमधून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या मायप्पा माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here