मुंबई,दि.१२: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत तरुणीने फिल्मी स्टाईल आंदोलन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल (शनिवार, ११ नोव्हेंबर) तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हैदराबाद येथे एका सभेला संबोधित केलं. या सभेला राज्यभरातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उपस्थित नागरिकांना संबोधित करत असताना एक विचित्र प्रकार घडला. आपली मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी सभास्थळी एक तरुणी चक्क विजेच्या टॉवरवर चढली.
हा प्रकार पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: विनंती करत तरुणीला खाली उतरण्यास सांगितलं. त्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर तरुणी विजेच्या टॉवरवरून खाली उतरला तयार नव्हती. अखेर मोदींनी तरुणीची तक्रार ऐकून घेण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर ती खाली उतरली. यावेळी सभास्थळी उपस्थित असणारे लोकही घाबरले होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
संबंधित व्हिडीओत पंतप्रधान मोदी विजेच्या टॉवरवर चढलेल्या तरुणीला वारंवार विनंती करताना दिसत आहेत. “प्लिज मुली, खाली उतर.. हे बघ, तुला दुखापत होईल… असं करणं चांगली गोष्ट नाही… आम्ही तुझ्याबरोबर आहोत… प्लिज… तू खाली उतर बाळा… मी तुझं म्हणणं ऐकून घेईन.. तिथे विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे… तू खाली ये.. हे ठीक नाही… असं केल्याने फायदा होणार नाही… मी इथे तुमच्यासाठीच आलो आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी तरुणीची समजूत काढली आहे.