दि.23: आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी मदरशांमध्ये शिकून तुम्हाला डॉक्टर अथवा इंजिनिअर होता येणार नाही असे म्हटले आहे. हिमंत बिस्वा सरमा यांनी, देशातील सर्व शाळांमध्ये एकसमान आणि सामान्य शिक्षण असायला हवे, यावर भर दत, ‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता पूर्णपणे संपुष्टात यायला हवे. तसेच, मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी अभ्यास करायला हवा, असे म्हटले आहे. ते दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
मदरशांमध्ये शिकून तुम्हाला डॉक्टर अथवा इंजिनिअर होता येणार नाही
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, जोवर हा शब्द (मदरसा) असेल, तोवर मुले डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याच्या दृष्टीने विचारच करू शकणार नाहीत. खरे तर, मदरशांमध्ये शिकून तुम्हाला डॉक्टर अथवा इंजिनिअर होता येणार नाही, असे जेव्हा तुम्ही मुलांना सांगाल, तेव्हा ते स्वतःच मदरशात जाण्यास नकार देतील.
धार्मिक ग्रंथ घरात शिकवले जाऊ शकतात
बिस्वा सरमा पुढे म्हणाले, ‘मुलांना त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करून मदरशांमध्ये पाठवले जाते. शाळांमध्ये विज्ञान, इंग्रजी आणि गणितासारख्या विषयांवर भर असायला हवा. धार्मिक ग्रंथ घरात शिकवले जाऊ शकतात. तर शाळांमध्ये मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी शिकवायला हवे.’
 
            
