Yashomati Thakur On Atul Bhatkhalkar: “सरन्यायाधीशांवर बोलण्याची भाजप आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज” यशोमती ठाकूर

0

मुंबई,दि.२१: Yashomati Thakur On Atul Bhatkhalkar: भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ताशेरे ओढत राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी प्रत्युत्तर देताना चांगलेच सुनावले आहे. 

अतुल भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल, अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला आहे. यावरून आता यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत पलटवार केला. (Yashomati Thakur On Atul Bhatkhalkar)

तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर…? | Yashomati Thakur On Atul Bhatkhalkar

अतुलदादा तुझी बहीण असती, तुझी आई असती किंवा तुझी बायको असती तर तु असच बोलला असता का? दादा आहेस ना तू? अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबा. काही सेन्सेविटी आहे की नाही? राजकारण करण्याच्या काही मर्यादा आहे की नाही? कशातही राजकारण करणार का, असे सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी अन्यथा न्यायालय कारवाई करेल, असे म्हटले होते, त्यांची चिंता स्वाभाविकच आहे. परंतु, आता सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर राज्यातील भाजप आमदाराने टीका करत न्यायालयाला सुनावणारे ट्वीट केले आहे. सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजप आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी राज्यपाल व सरन्यायाधीश यांना अवगत करु, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here