माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरून विजयसिंह मोहिते-पाटील वेगळा निर्णय घेणार?

0

सोलापूर,दि.१८: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देऊन दुसरे इच्छुक धैर्यशील मोहिते-पाटील यांना डावलल्याने त्याचे पडसाद मोहिते-पाटील समर्थकांमध्ये उमटत असताना रविवारी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सकाळी विविध पक्षांच्या नेत्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतल्यानंतर या निवडणुकीत मोहिते-पाटील काहीतरी वेगळा निर्णय घेणार, असे वाटत असताना सायंकाळी भाजपाचे संकटमोचक तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शिवरत्न बंगल्यावर येऊन मोहिते-पाटील समर्थकांची भेट घेतली व त्यांच्या भावना वरिष्ठांना कळवून निर्णय घेतला जाईल, असे सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

रविवार हा माढा लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. सायंकाळी अकलूजमध्ये दाखल झालेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मोहिते-पाटील समर्थकांनी घोषणाबाजी केली होती तर बैठक संपल्यानंतरही समर्थकांनी माढ्याची उमेदवारी धैर्यशील मोहिते-पाटील यांना देण्याची आग्रही मागणी केली. यावेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील करताना दिसत होते. दरम्यान महाजन यांनी स्पष्ट केले की आपण विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून त्यांना येथील परिस्थिती समजावून सांगणार आहोत. आणखी वेळ आपल्या हाती आहे.

मी विजयदादांची भेट घेतली असून त्यांचे राजकीय, सामाजिक व विकासात्मक काम मोठे असून त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. मी सर्व समर्थकांच्या भावनाही जाणतो. वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना माहिती दिली जाईल, असे महाजन म्हणाले. सव्वापाच ते सव्वासात असे दोन तास बैठक सुरू होती. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.

सकाळी शेकापचे आमदार भाई जयंत पाटील विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह माजी आमदार राजन पाटील, संजीवराजे निंबाळकर व अन्य नेत्यांनी विजयसिंह मोहिते- पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशी शिवरत्न बंगल्यावर येऊन चर्चा केल्याने मोहिते-पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सायंकाळी भाजपचे मंत्री महाजन हेच समजूत काढण्यासाठी शिवरत्नवर आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता भाजपा वरिष्ठांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here